*स्वतःसाठी जग सखे*
*स्वतःसाठी जग सखे*
तो काळही सरला सखे
ती जुनी वेळही गेली निघून
नव्या ढंगात स्वतःला बदल
झालं गेलं ते सगळं विसरून
तिखटमीठ कमी जास्त पडलं तर
लावत बसू नको मनाला दूषण
छोट्या मोठया चुका होतच राहणार
सांग हे सगळयांना ठणकावून
कर्तव्याच्या दबावाखाली वाकवत
पाडले जातात सर्वच सोपस्कार
संसाराच्या रहाटगाड्यात हरवून
इतरांसाठी अजून किती जगणार?
दुसऱ्याच्या प्रगतीत हुरळून न जाता
आपलं गोड मानून मार जरा मिटक्या
त्याचं त्या जगण्याला कंटाळलीस तर
हॉटेल किंवा चित्रपटगृहात टाक फेरफटका
जुन्या नव्या आठवणींना उजाळत
पूर्ण कर एखादं स्नेहसंमेलन किंवा सहल
तुझ्या वाचून इतकं काही नाही अडणार
घरातल्यांनीही घ्यावी अस्तित्वाची दखल
तुझ्याने जितकी होईल तितकीच
कर संसाराची ओढाताण राणी
बक्षीस किंवा पुरस्कार मिळवायला
कशाला व्हायचंय तुला आदर्श गृहिणी
तारुण्यात राहिलेल्या ईच्छा अपेक्षांचा
उतारवयात नको तो पश्चाताप
ऐन संध्याकाळी करत बसायचा का
अपूर्ण स्वप्नांचा मनावर घणाघात ?
स्वतःसाठी वेळ काढून छंद सगळे आठव
हीच ती वेळ भगिनी जप तुझी आवड
पुन्हा सगळं आयुष्य नव्याने सुरू कर
यापुढे मन मारून जगणं आतातरी सोड
