आयुष्यरुपी चहा
आयुष्यरुपी चहा
आयुष्याच्या पातेल्यात
सर्व असावे प्रमाणात
पाण्यासारखा व्यवहार पारदर्शी
त्यात टाकावी दुधाची स्फूर्ती
कटू पण तजेल चहापत्ती
मधुर शर्करेची सरबत्ती
अहंभावाच्या आल्याला ठेचाव
मायेच्या वेलचीला पेराव
सर्व जिन्नस एक एक टाकावे
मंद आचेवर उकळत रहावे
धीमे धीमे हर्षाचा उमडेल सुवर्णरंग
समाधानाचे उठतील फक्कड तरंग
चिंतेला वाफेवर उडू द्यावे
नकारार्थी विचारांना गाळावे
किणकिणत्या कपांची झळाळी
समाधानाचा चहा प्यावा निवांत वेळी
मनाची मरगळ झटकून पडते
चैतन्याची लहर अशीच दौडते
प्रगतीच्या वाटेवर घट्ट होत जाणारा चहा
दीर्घकालीन सुखाचा आस्वाद असाच घ्यावा
