भाऊराया तुझी उणीव
भाऊराया तुझी उणीव
प्रत्येक वेळी रक्षाबंधनाला
भासते भाऊराया तुझी उणीव
माझ्या सासरच्या उंबऱ्यालाही
व्हायला लागते हळवी जाणीव
किणकिण करणाऱ्या बांगड्या
अन् सांगते कपाळावरची टिकली
सांसारिक जबाबदारी पार पाडताना
माहेरची नाती आपसूक हरवली
वेड्या बहिणीची वेडी आशा
दाराकडे नजर पळते सारखी
हात सुना न ठेवता ह्या वेळी
येशील ना तू बांधायला राखी
नको रे धनदौलत पैसाअडका
डोक्यावर हवा मायेचा हात
तू कायम पाठीशी उभा राहा
फक्त हवी तुझी भक्कम साथ
ह्या रक्षाबंधनला हवं एक वचन
हातावर विश्वासाचा हात ठेव
सांग हरवणार नाही ना कधी
माझ्या मुलांचं मामाच गाव
