स्त्रीभ्रूणहत्या
स्त्रीभ्रूणहत्या
काळ्याकुट्ट अंधाऱ्या राती
तिचा लागेना डोळ्याला डोळा
कोण हिसकावून घेईल बर
उद्या तिच्या पोटचा गोळा ..
आई अशी एक आर्त हाक
तिच्या कानी घुमली
तिच्याशी बोलू लागली
पोटातली तिची छकुली
आई येऊ दे ना ग
मला या सुंदर जगामध्ये
माझ या जगात येण
आहे तुझ्याच हातामध्ये
नाही करणार हट्ट कोणता
आहे त्यात समाधान मानीन
कोणी असो वा नसो
मी तुझ्या सोबत राहीन
मनमोकळ्या गप्पा आपण
दिवस रात्र कधी मारू
खेळात दोघी जिंकू
कधी दोघीपण हारू
छोट्या कळीच आई मला
सुंदर फूल बनायचय
फुलांफुलांवर उडणार
फुलपाखरू बनून मिरवायचय
शिकून सवरून बघ आई
मोठी कुणीतरी बनेन मी
बाबांच्या नावाचा झेंडा
अटकेपार लावीन मी
सुनिता होईल कल्पना होईल
फक्त एक संधी दे
निर्धार कर पक्का मनी
मला जन्म घेऊ दे .
डोळ्यात तिच्या एक
आली चकाकी वेगळी
मी फुलवणारच माझी
ही छोटीशी सुंदर कळी
नाही ऐकणार कुणाच
एकटी जगाशी लढेन मी
नाही खुडू देणार कुणाला
माझ्या कळीला फुलवेन मी .......
