स्त्री शक्तीचा जागर
स्त्री शक्तीचा जागर
जननी म्हणजे स्त्री म्हणे
स्वर्गा पेक्षा महान
रोजच तिला छळताना
विवेक ठेवता का गहाण?
जिच्या उदरी जन्म घेतला
विटाळ तिचाच होतो.
देवालयी पुजारी सुद्धा
दार लोटूनी घेतो.
जळी स्थळी घरी दारी
घुसमट तिची ठरलेली.
महिला दिनी त्याच्या मुखी
साखर मात्र पेरलेली.
याच दिनी येते सर्वा
स्त्री महतीचे भरते.
सबलीकरणाचे वारे मग
दहा दिशातून फिरते.
आदर तिचा करण्यासाठी
दिवस शोधता कशाला?
जगू द्या तिला सन्मानाने
अभिमान वाटेल देशाला.
दिवस साजरा केल्याने
होत का हो स्त्री मुक्ती?
द्या तिला हक्क सारे
नको बंधने,नकोच सक्ती.
झेप तिलाही घेऊद्या
अफाट या गगनामधूनी.
इंद्रधनूही फिका पडेल मग
रंग तिचे ते पाहूनी.
हृदयी तिच्या भरला आहे
माया ममतेचा सागर.
अभिमानाने करू चला
स्त्री शक्तीचा जागर.
