सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ
हरवली सिंधूमाई
दीन अनाथांची आई
शोधू कुठे? कसे? बाई
सुचेना मला काही...१
सोसल्या दुःखाच्या गारा
भीषण वेदनेचा मारा
परी मनाचा गाभारा
मायेने भरलेला...२
अनाथ त्या लेकरांना
दुःखी कष्टी वंचितांना
गोड निष्पाप जीवांना
दिली मायेची ऊब...३
नाही कोणी धनी वाली
धावुनी आली माऊली
झाली उन्हात सावली
जणू वात्सल्यमूर्ती....४
जशी वासराला गाय
असे लेकराची माय
बनली दुधाची साय
धन्य ती सिंधूमाय...५
मी वनवासी म्हणत
सारे आयुष्य वेचत
काट्यांची फुले करत
जीवनाचा प्रवास...६
घेवूनी ओटीत वसा
चालवू तुझा वारसा
होऊ एक कवडसा
अंधाऱ्या जीवनात..
