श्वास श्वासात गुंफताना
श्वास श्वासात गुंफताना
शब्दही व्हावे मुके तू मज समीप असताना
उमलावी कमलदले श्वास श्वासात गुंफताना...।।धृ।।
खुलूनी येता कळी अबोली
तार झंकारावी हृदयातली
क्षण ही जावा थांबून पळभर
गुज हृदयगर्भातील उलगडताना
उमलावी कमलदले श्वास श्वासात गुंफताना.....।।1।।
साद घालिती हिरव्या वनराई
मंद झुळूक ही वेडावून जाई
तन-मन अवघे रंगून जावे
तरंग भावविश्वाचे जपताना
उमलावी कमलदले श्वास श्वासात गुंफताना...।।2।।
मुक्त झुलावा हा मनाचा झुला
प्रीत रसाने न्हाऊन चिंब ओला
खडतर मार्ग ही व्हावा तारकांचा
तुज संगतीने मी पावले टाकताना
उमलावी कमलदले श्वास श्वासात गुंफताना
शब्द ही व्हावे मुके तू मज समीप असताना
उमलावी कमलदले श्वास श्वासात गुंफताना...।।3।।