श्रावण कधीच संपत नसतो…
श्रावण कधीच संपत नसतो…
श्रावण कधीच संपत नसतो…
तो अखंड आहे... चिरंजीवी आहे…
श्रावण अखंड वाहत राहतो...
महेशाच्या जटातुन गंगा रूपाने...
शीतल निर्मल जलातुन.....
भक्तांना पावन करतो…
पाप नष्ट करतो त्यांचे…
त्यांना पुण्यवान बनवतो…
श्रावण पुन्हा गंगाजलातून
प्रवेशतो भक्तांच्या कमंडलूत...
सहस्त्रधारा रुद्राभिषेक करतो…
श्री शंभूच्या पिंडीवर…
पंचामृत तीर्थाने…
पुन्हा वास करतो अखंड….
प्रत्येक जीवाच्या अंतरात्म्यात…
पंच महाभूत तो होतो...
श्रावण अखंड घुमत राहतो…
राऊळाच्या घंटा निनादात…
टाळांच्या किणकिणात...…
हरिनामाच्या गजरात…
आरतीच्या मंजुळ स्वरात…
शंख ध्वनीच्या नादात…
डमरूच्या डमडम आवाजात…
म्हणत राहतो... हर हर महादेव...
श्रावण अखंड दरवळतो…
कापराच्या मंद सुवासात…
पंच आरतीच्या ताटात….
तुपाच्या फुलवातीत..
नंदादिपाच्या प्रकाशात…
तेवत राहतो अखंड...
लोक कल्याणासाठी...
श्रावण अखंड फडफडतो…
मंदिराच्या भगव्या पताकातून…
कळसावरून वाहणाऱ्या वाऱ्यात…
तो सळसळतो बिल्वपत्राच्या वृक्षात...
बिल्वरूपाने पुन्हा शिवमस्तकी चढतो…
अनंत जन्माचे पापक्षालन करून
घडवतो एक एक महान पुण्यात्मा…
श्रावण अखंड उद्घोषत राहतो…
“ओम त्र्यंबकम यजामहे...” म्हणत…
तोच महा मृत्युंजय होऊन जातो..
चिरंजीव होऊन जातो…
तोच होतो देवाधिदेव महादेव…
श्रावण कधीच संपत नसतो…
तो अखंड आहे... चिरंजीवी आहे…
©® गंगाशिवकपुत्र
