शीर्षक :- गाव शब्दांचे लाडके
शीर्षक :- गाव शब्दांचे लाडके
पायी बांधून अक्षर
आणि शब्दांचे पैंजण
वही वेशीवर त्याचे
असे चालते नर्तन
शब्द सुंदर हो माझे
नित्य उधळी रतन
पदन्यास त्याचे असे
मनगाव हरवून
पंक्ती मागून पंक्तीचे
चालविते आवर्तन
पुरतेच हिरावून
घेते भावनांचे बन
गाव शब्दांचे लाडके
माझ्या आधी तेच पण
माझे असून नाहीच
उरतेही माझेपण
रिते करतात शब्द
मनुलीचे ओझेपण
त्यांचं मला माझं त्यांना
असं चालतं जपणं
माझ्या आधीच कळते
दु:ख माझे ह्या शब्दाला
किती आहे खोलवर
तेच सांगती गावाला
माझे मला न उरते
वेळ काळाचेही भान
तृप्त होतो मनगाव
राखताना शब्द मान
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
