शेतकरी बाप माझा
शेतकरी बाप माझा


राब राब शेतात राबून
कडक उन्हात तापतो
माझा शेतकरी बाप
उभ्या जगाला पोसतो //१//
रातदीन डोळ्यात चिंता
उठती विचाराचे काहूर
कधी बाहुलं निसर्गाचा
मन पावसासाठी चिंतातुर //२//
स्वप्न आशेची हृदयात
साठवूनी मनात जागी
घेऊनी आसमंत डोळ्यात
ताळे हिशोबाचे आखी //३//
राबणाऱ्या हातावर
उतरली नक्षी फोड्यांनी
उचलता कर्जाचा भार
वाहती धारा अश्रूंनी //४//
काय उभ्या जगराहटीत
किंमत मालास कवडीमोल
कधी फेकावं टमाटे,कांदे
रोगराईने होई पिकाचे फोल //५//
दिनरात कामतरी कर्जाचा डोंगर
कशी स्वप्न मिळती धुळीस
दुःखाने जेव्हा कळस गाठतो
असह्य बाप माझा लावी गळफास //६//