शब्द माझे सोबती...
शब्द माझे सोबती...
जीवन प्रवासाच्या सुरुवातीला
अक्षरांची भेट झाली,
अनोळखी त्या अक्षरांशी मी
जरा दबकतच हातमिळवणी केली
चालता चालता एके दिवशी
अक्षरे मला विचारू लागली...
प्रवासातील आमची सोबत
तुला कशी बरं वाटली?
मी म्हटलं थांबा जरा!
अजून नेमकी ओळख नाही पटली,
पण त्यांच्या सोबतीची
दाद नक्कीच द्यावी वाटली
कित्येक दिवस सरले
कैक वर्षे निघून गेली,
अक्षरांना ओळखता ओळखता
शब्दांशीही गट्टी जमली
आता मात्र अक्षरे नि शब्दांची सोबत
हळूहळू मला आवडू लागली
नाही म्हणता म्हणता
माझी मीच त्यांच्यात रमून गेली
शब्दांशी हितगुज करता करता
'कविता" माझी सखी झाली,
अन् कवितेची प्रत्येक पाने
पुन्हा शब्दांनीच रंगून गेली
आयुष्याच्या गोड वळणावरती
महाराष्ट्र कवी मंचाची हाक ऐकू आली,
अवतीभवती पाहतो तर काय?
इथे तर शब्दवेड्यांचीच गर्दी झाली
शब्दवेडे असले तरी
त्यांनी माणुसकी नाही सोडली
लेखणीच्या अन् विश्वासाच्या बळावर
अवघ्या महाराष्ट्राची मने सांधली
भावनांना मांडण्याची कला
शब्दांनीच आम्हाला दिली,
अशीच राहू दे शब्दांची सोबत
हीच प्रार्थना आम्ही ईश्वरचरणी केली