साद घालते काळीज माझे
साद घालते काळीज माझे
पुन्हा एकदा त्याच वळणावर
तुझी अन् माझी भेट घडावी
शब्द सारे अबोल व्हावेत
फक्त नजरेला नजर भिडावी
पुन्हा एकदा पाहून डोळ्यांत
निःशब्द होऊन तू बुडून जावे
विसरुनी मग हे जग सारे
फक्त मला नि मलाच पहावे
पुन्हा एकदा घेऊन हात हाती
जुन्या वचनाची करावी आठवण
वाटते पुन्हा एकदा नव्याने जगावे
सोबतीचे ते आठवणीतले क्षण
पुन्हा एकदा तुझ्या मिठीत
अंग अंग हे शहारून जावे
हरवलेले प्रेमाचे सूर
पुन्हा एकदा जुळून यावे
साद घालते काळीज माझे
पुन्हा एकदा आज तुला
तुझ्याविना मी असे अधुरी
तू समजून घे रे प्रीत फुला
माझ्यासाठी पुन्हा एकदा
मृत्यूलाही तू हरवून यावे
अधुरे प्रेम तुझे अन् माझे
आज सख्या रे पूर्ण व्हावे

