रंगाची रंगपंचमी
रंगाची रंगपंचमी
रंगांनीच ठरवली खेळायची रंगपंचमी
पसरली बघता बघता सर्वत्र बातमी
धर्म म्हणाले आमची नाही परवानगी
विलगता रंग धर्मातील, अवस्था होईल केविलवाणी
झेंड्यांनीसुद्धा फडकावले बंडाचे निशाण
म्हणाले रंगाशिवाय दिसू आम्ही भयाण
सुमनांनीही नकारघटांच वाजवली
रंगावाचून पुष्पे? कल्पनेनेच कोमेजले
पशुपक्ष्यांनीही अनुमती नाकारली
रंगहीन स्व-रूप पाहून धास्तावली
इंन्द्रधनुष्य आले धावून मदतीला
घ्या म्हणाले सप्तरंग सारे उधळायला
इंन्द्रधनुचे कर्णवत औदार्य हे पाहून
धर्म अन ध्वज सारे गेले ओशाळून
पशुपक्ष्यांनीही केले क्षमायाचन
फुलांनीही सोडले तद् मानभावीपण
ऐकून हे रंगाचा सगळ्या चेहरा तो उजळला
उचलले पटापट रंग तांबडा,नारिंगी, पिवळा,
हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा
सामिल झाले रुपेरी, सोनेरी, पांढरा व काळा
पारव्याने उधळला तांबड्यावर निळा
दोघांचे अस्तित्व झाकोळून प्रकटला जांभळा
भगव्यानेही टाकला तांबड्यावर पिवळा
अचंबित झाला जेव्हा भगवाच अवतरला
सप्तरंगी होता ती उधळन प्रकटला ढवळा
जांभळ्याने फेकला निळा, हिरव्याने पिवळा
औत्सुकतेने पाहत होता भगवा
पहातोतर पुन्हा तयार झाला हिरवा
रंगांत न्हाऊन रंगांच्या, रंग
झाले इंन्द्रधनुष्य निर्माण पुन्हा मग
मिळाली शिकवण सर्वांना
सोडून द्या संकुचित पणा
