रक्षण
रक्षण
ऐकुनी झाले कान तप्त, जणु लोहरस ओतला...
का तुझ्या जीवाशी कोण नराधम खेळला...
बालपण कुस्करे क्षणात नियती ही कशी जणू,
वेलीवरची कळी खुडावी तशी खुडावी तुला जणू...
अत्याचार हा किती पाशवी शत्रुलाही वाटे शरम,
ऐकूनी ही तुझी कहाणी रक्त उफाळून होई गरम...
लहानग्या ह्या जीवाची आर्त ही किंकाळी,
जंगली श्वापदामध्ये पुसटशी ती भासली...
काय असा केला गुन्हा नको विचारु पुन्हा पुन्हा,
निष्पाप जीवाशी खेळ पाहुनी मनी उरल्या आर्त खुणा...
नको असे पुन्हा म्हणू पुनर्जन्म हा नको मुलीचा,
तुझ्यावीण पूर्ण नसे समतोल ह्या पृथ्वीचा...
स्त्रियांनो तुम्हीच घ्या शस्त्र हाती बोलणे हे वाटे बरे,
नाजुक नाजुक कळ्यांनी मग काय करावे सांगा खरे...
लहानग्या ह्या जीवांचे कोण करील रक्षण?
जेव्हा कुंपणच करी शेताचे भक्षण ,शेताचे भक्षण।
