प्रीत आपली
प्रीत आपली
शब्दांच्या पलीकडल्या
गावात सख्या मी आली
भेट तुझी नी माझी होता
मोहरली प्रीत आपली//१//
चालती दूर दूर पाय
विसावा जीवाला नाही
निःशब्द भटकतांना तुझ्यासंगे
निर्भय हे मन राही//२//
भावनांच्या सरोवरी
भिजली चिंब ही काया
ओथंबलेल्या शहाऱ्यांना
स्पर्श करी भाव तुझे राया//३//
अस्तित्व तुझे सभोवताली
प्रीत गाती प्रीतीची गाणी
अबोल या मनात उठली
सप्तसुरांची मधाळ वाणी//४//

