प्रेमकाव्य
प्रेमकाव्य
हळूवार तुजपाशी
मन मोकळे करते,
अंतरीचे अलगुज
मग सहज खोलते...!!१!!
क्षण माझे मोहरले
मनी गुंजन प्रेमाचे,
दृष्टादृष्ट होई अशी
अंगी रोमांच क्षणाचे...!!२!!
आठवते प्रित मज
राधा-कृष्ण लीलाधारी,
मन अधीर तसेच
माझे होतसे सत्वरी....!!३!!
आयुष्याच्या परीघात
प्रित सहज फुलली,
अंतरीची खूण अशी
नजरेत बावरली....!!४!!
दु:खी मन कितीतरी
किती एकाकी क्षण,
सौख्य देऊनी जीवनी
तुझं अवचित येणं....!!५!!
साथ आता जन्मोजन्मी
हात हाती राहो सदा,
आयुष्याच्या क्षणोक्षणी
प्रितसर कित्येकदा..!!६!!