प्रेम
प्रेम
प्रेम…
“माझं प्रेम आहे तिच्यावर”
असं जेव्हा शब्द कानावर पडले,
क्षणभर मनात प्रश्न दाटला —
“ती” कोण असेल बरं?
आई असेल का?
जिच्या मायेने जीव फुलतो…
कन्या असेल का?
जिच्या हास्यात भविष्य दडलेलं…
बहीण असेल का?
जिच्या नात्यात निरागस जिव्हाळा…
मैत्रीण असेल का?
जिथे विश्वासाचं घर बांधलेलं…
की जोडीदारीण असेल?
जिच्यासोबत आयुष्याची वाट चालायची आहे…
प्रेम फक्त शरीरावर नसतं,
क्षणिक सुख देणारं नसतं;
प्रेम म्हणजे स्पर्शापलीकडचं नातं,
मनाशी मनाचं जुळणं.
प्रेम दयाळू असतं,
मत्सर करत नाही, बढाई मारत नाही;
अहंकार त्याला शोभत नाही.
ते सहज रागावत नाही,
भूतकाळाच्या चुका मोजत बसत नाही.
प्रेम कधीही वाईटात आनंद मानत नाही,
ते सत्यात, प्रामाणिकपणात
आनंद शोधतं.
प्रेम म्हणजे करुणेची भावना,
समजुतीची ओल,
आणि निस्वार्थ जपलेलं
एक पवित्र नातं…
— गिरीश
