"प्राणप्रिय लेखणी.."
"प्राणप्रिय लेखणी.."
देशील का ग.. असे सामर्थ्य मजला..
हे माझे.. प्राणप्रिय लेखणी..?
येईल का ग.. बहरून या कागदावर..
एक कविता.. साजिरी देखणी..?
पाझरेल का ग.. हृदयातून माझ्या..
अखंड शब्दांचा.. एक मंजुळ झरा..?
वाहेल का ग.. तो खळखळून..
हसत खेळत.. नागमोडी अन् भीरभिरा..?
अन् मिळेल का ग.. जाऊन तो झरा..
साहित्याच्या अथांग सागराशी..?
होईल का ग.. मिसळुन एकरूप..
ते शब्दरुपी झऱ्याचे पाणी.. सिंधूशी..?
पण भिती वाटते ग.. कधी कधी..
कोणी या पाण्याला.. बांध घातला तर..!
आणि हे शब्दरूपी पाणी.. वळवले तर..
किंवा हे माझेच आहे.. असे म्हणले तर..!
नाही ना ग.. अस कोणी आडवणार..
या मधाळ.. झऱ्याच्या पाण्याला..!
अरे हो.. असे कसे होईल पाण्याला..
कोण करेल हिम्मत.. त्याला अडवायला..!
हो ना ग.. पाण्याला ना रंग असतो ना गाव..
ते ज्यामधे मिसळेल.. तसेच तर दिसेल..!
तसेच शब्दाचे.. ज्यांना स्फुरतील..
त्यांनाच तर.. ते दिसतील..
अन् ओठांवर येतील..!
खरंच ना ग.. लेखणी..
तुझ्यामधून माझ्या कवितेत फुलणारी शब्दे..
अन् झऱ्यातून वाहणारे.. अवखळ पाणी..
सारखेच तर भासतात..!
बरोबर ना ग..
पाणी झऱ्यातून आणि शब्द कवितेतून..
एक सुरात.. एका तालात.. एका लयात..
अखंड.. अन् मंजुळ तर वाहतात..!
मग देशील ना ग.. मला असे सामर्थ्य..?
हे माझे.. प्राणप्रिय लेखणी..?
माझ्या कवितेतील शब्दांना..
खळखळून वाहण्यासाठी..!
अन् त्या विशाल साहित्य सिंधुमध्ये..
एकरूप होण्यासाठी..!
अन् हो.. तरच येईल ती..
बहरून कागदावर..
अन् दिसेल सर्वांना..
एक कविता.. साजिरी देखणी..!
