*स्मृती 2022 च्या... संकल्प 2023 चे...*
*स्मृती 2022 च्या... संकल्प 2023 चे...*
करोना देवा काय वर्णू तुझा चमत्कार....
मनापासूनी घ्या की हो माझा नमस्कार...!!
शिरी मुकुट धारूनी मिरविलेस राजापरी..
दोन वर्षे उडविलीस सर्वांची भंबेरी...!!
राजा पडता उडते सैन्याची दाणादाण...
तसे कंठाशी आणलेस आमुचे पंचप्राण...!!
किती गोळ्या अन औषधांचा झाला भडिमार...
गिनी पिग करुनी सुरू जाहले उपचार...!!
ह्या रोगाने मिटविला फरक राजा अन् रंकाचा...
लक्तरे जाती खंद्यावरूनी अन
कोट्याधीश धनी कोपऱ्याचा.
फिरणे बंद चालणे बंद अडकलो घरपंजरी...
मुखपट्टी बांधुनी जो तो फिरे घरच्याघरी..!!
माणसे अडकली घरात गजांच्या आड...
हिंस्त्र श्वापदे फिरती शहरी रस्ते उजाड...!!
अस्पृश्यागत वागवती सारे एकमेकांना..
सहा फुटांचे अंतर राखिती मने तोडताना...!!
लाटांमागुनी करीती लाटा ध्वंस जीवनाचा..
किनाराही वाहून गेला जन मानसाचा...!!
मत्त राजकीयांनी त्यातही शोधला मार्ग कमाईचा...
दोन पैशांच्या औषधासाठी दाम सांगती लाखोंचा..!!
हळूहळू ओसरला भर अनाम भीतीचा...
रस्त्यावर उतरला मग झरा मानवतेचा...!!
कुणी वाटीती कपडे आणिक ओघ वस्तूंचा....
भुकेल्या पोटी घास घालती हात नाखडे कोणाचा....!!
धर्म जात विसरूनी खुल्या जाहल्या सीमा मनाच्या...
आयत्या बिळातील नागोबानी
रोखल्या हद्दी राज्यांच्या ...!
बा करोना, एक तू चांगले शिकवलेस...
माझे माझे करणाऱ्यांचे क्षणात धुळीत मिळवलेस...
करोडो श्वासांचे ना कधी आभार मानले....
मशीनने श्वास मात्र लाखो ओतून घेतले...
आता एकच धडा, भरू न द्यायचा पापाचा घडा...
खुल्या दिलाने खुल्या मनाने मनसे जोडा....
अडल्या नडल्या धरा जरा मायेने उराशी...
विसरू नका देऊळ सोडूनी देव उभा तुमच्यापाशी...
बा देवा करोना महाराजा, खूप शिकवले आम्हासी...
जा तू परत सुखाने आता अपुल्या महेरासी...
येऊ नकोस पुन्हा सोडूनी तुझी वेस....
जन्मल्या घरी तू नांद सुखाने,
हेच तुजसाठी बेस...!!
