पणती होवू या
पणती होवू या
आधाराची घट्ट जोड अन्
ममतेचा ओलावा जपू या
आशेची नवंकिरण देणारी
इवलीसी पणती होवू या ॥धृ॥
दाटलाय चोहीकडे आज
एकाकीपणाचा अंधकार
पातक कर्मांनी जगती या
माजलाय खूप हाहाकार
घाबऱ्या जीवास विसावा
अन् प्रेमाचा हात देवू या
विश्वासाने व्यक्त होणारी
इवलीसी पणती होवू या ॥१॥
समतोल ढासळलाय इथे
कोवळ्या भाव भावनांचा
मुक्त,निर्भय संवादावाचून
घसारा होतोय नात्यांचा
दुभंगलेल्या काळजाला
मानवाला एकत्र आणू या
मुखी हास्य फुलविणारी
इवलीसी पणती होवू या ॥२॥
माझं माझं करता करता
थोडं समाजाचं देणं फेडू
स्वार्थात गुरफटलेल्या या
निद्रीस्त मनाची तार छेडू
माणुसकीचे कमळ पुष्प
हृदयजलाशयी रूजवू या
प्रीत सुगंध दरवळणारी
इवलीसी पणती होवू या ॥३॥
जात,पात,धर्म,पंथ,भाषा
खूप ओढल्या लक्ष्मणरेषा
माणसातला माणूस' हीच
नवीन ओळख पटवू देशा
झुळूक बनून स्वयंप्रेरणेची
लुप्त संवेदना जागवू या
अंतरी हळूवार स्पर्शणारी
इवलीसी पणती होवू या ॥४॥
