पायपीट
पायपीट
1 min
35
कोरोना काळातील समाजजीवन - कोरोना कालावधीत मजुरांचे कसे हाल झाले... ते त्यांच्याच शब्दांत...
भविष्याच्या शोधासाठी
सोडीला मी माझा गाव
कोरोनाच्या संकटाने
केला साऱ्यावरी घाव
थांबला हा देश सारा
मार्ग सारे बंद झाले
चालतो मी माझी वाट
सोबतीचे पुढे गेले
डोई भार संसाराचा
वर लागते हो धाप
घराचीये वाटेवरी
पाय चाले झपाझप
पाय सोसिती चटके
डोई माजले काहूर
मागे सोडल्या स्वप्नांनी
वाढविली हूरहूर
अंतरीचे धागे माझ्या
मला ओढती हो गावी
त्यांच्या गुंफनीची विण
माझ्या जीवालाच ठावी
स्वप्न घेऊनिया आलो
इथं मातीत रमलो
कष्ट सोसले अपार
नाही संकटा नमलो
घाम गाळूनी राबलो
नाही आता कांही काम
चिंतातूर मालकाला
सांगा मागू कसा दाम
काम नाही येथे काही
नाही आला मज वीट
कधी संपेल सांगा हो
माझ्या नशिबीची पायपीट