पावसा
पावसा
1 min
20
आला गरजत तू रे
भुई सारी केली ओली
थंडावला जीव माझा
आनंदून पेर केली
पेर केली आनंदून
नाही फुटला अंकुर
लख्ख उन्हात दिसते
काळे कुट्ट रे वावर
आता समजेना कांही
कसे सोडवावे कोडे
कसे आणावे बियाणे
कसे चुकवावे भाडे
जिवापाड जपलेल
खोंड खिल्लार अल्लड
आता विकतो हा जीव
नको करू तू हुल्लड
किती वाट पाहू तुझी
कुठे गेला तू रुसून
ओशाळला जीव माझा
इथं शेतात बसून
ओटी भरून दोनदा
माझी मला येते कीव
हाती निराशेचे पीक
वाटे संपवावा जीव
तूच सांग माय बापा
कधी दुःख हे सरन
तुझ्या एका सरीवरी
माझ जीवन मरण