पाऊस अवकाळी 🌺
पाऊस अवकाळी 🌺
सूर्य लोपला आभाळीचा दिसे सर्वदूर अंधार
काय करावे काही सुचेना देवा तूच तारणहार
ओला-सुका दुष्काळ आयुष्याचा नाही कोणी वाली
विजता विजता ज्योत तेवली जा पावसा अवकाली
करू नको रे दाना दान आमची पावसा अवकाली..
खेळ सारा नियतीचा पांडुरंगा तुच एक आधार
शेत बहरलं सोन्यावाणी नको अवकाळी धार
सुखी आयुष्याचं स्वप्न पाहिलं पहाटेच हिरवगार
झाली लेकरं हिरवी पान तृषा तृप्त धरणी व्याली
हात जोडतो वरुणराजा नको येऊ तु अवकाली..
...
झाला मूग उडीद सोंगून राहिली ज्वारी रानातं
नको पाहू अंत देवा लक्ष्मी आलिया दारातं
घास जाईना पोटातं मनाची धावं वावरातं
वाऱ्यासंगे जा जरा तू पावसाळा अवकाली...
नको आणू राजा परत आमच्या वर दुःखाची पाळी
रोज रडावे रोज मरावे सुखी ठेव कधी काळी
नको गोंधवू नशीब रेषा काळी दुःखाची कपाळी
मनात हसू आणि डोळ्यात आसू येते अवकाली...
चंद्र चांदण्या ढगात लपल्या पानी दडले पक्षी तरु
छप्पर टिन घर कौलारू कशी मी तुझी वाट आवरु
आज हरलो हतबल झालो सोसले नित्य दुःखाचे वार
पाहू दे रे स्वप्न सुखाचे सकाळं संध्याकाळी...
अंधाराला रोजच पुजल्या गाठी अश्रू गोळा झाली
करु नको रं पाप नको ठपका घेऊ आपल्या भाळी
नको घास तोंडचा पळवू करू नको राखरांगोळी
निघून जा रं वेगे पर्वत रांगी पावसा अवकाळी...
