अराजक
अराजक
वरकरणी दिसणारे हसरे - आनंदी चेहरे
मनात मात्र असतो त्याच व्देषाचा डंख,
त्याच्याच सोबतीला तिरस्कार, क्रोधाचा भडाग्नी
हा पण असतो अराजकाचाच शंख...
जाती - धर्माची थाटून दिमाखात दुकाने
भाजून घेतात आपल्या स्वार्थाची पोळी,
माणुसकीलाच लुटून वेशीला टांगतात लक्तरे
ही पण असते अराजकाची नशा गोळी...
पाठ्यपुस्तकात असलेली समता,न्याय, बंधूता
रोजच्या जगण्यात मात्र कधीची हरवली,
हम करे सो कायदा म्हणत
गुंडांनी अराजकाची दहशत खुलेआम मिरवली...
खून, बलात्कार, खंडणीचे कैक कारनामे
सोसताना समाजमनही झालंय आता हतबल,
पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेपाचा मामला
मोकाट गुंडांच्या अराजकाचे वाढवतोय मनोबल...
षडयंत्रांनी जातीयवादाचे मनात विष पेरुनी
सामाजिक स्वास्थ्याला पोहचवतात मोठा धोका,
पदोपदी खोट्या देशभक्तीची नौटंकी करत
साधतात आपला अराजक माजवण्याचा मोका...
मनावरची दहशतीची ही टांगती तलवार
आता कुठंवर निमूटपणे सोसत रहायची,
निर्भय, निखळ समाजासाठी होवूनी एकजूट
या अराजकाला कायमची मूठमाती द्यायची...
जो करेल इथं मस्तीची भाषा
त्याला शिकवू एकजुटीच्या ताकदीचा धडा,
राजकीय गुंडगिरीचाही करुनी समूळ नायनाट
कलंकित अराजकाच्या पापाचा भरु घडा...
अराजक म्हणजे निकोप समाजाला कलंक
अराजकाला नसतोच कधी कुठला धर्म,
अराजकाची विषवल्ली जातीयवादातून फोफावते
अराजकाला संपवणे हेच खरे देशभक्तीचे कर्म...
.....
