STORYMIRROR

Nishikant Deshpande

Tragedy

4  

Nishikant Deshpande

Tragedy

कुणास दु:खे सांगायाची?

कुणास दु:खे सांगायाची?

1 min
570


आसवांसही खंत वाटते गालावरुनी ओघळण्याची

सभोवताली कुणी न अपुले, कुणास दु:खे सांगायाची?


ज्यांना ज्यांना जवळ घेतले मायेने, ते दूर उडाले

सखे म्हणोनी इच्छा होते तुझियासंगे भांडायाची


काळ टोचतो, कधी काढतो ओरखडे का दृदयावरती?

घड्याळ दावी काळ म्हणोनी पध्दत काटे असावयाची


कानाडोळा केल्याने का दूर संकटे पळून जाती?

संकटकाळी वेळ खरे तर, असते डोळे उघडायाची


दुरून दिसती घन आकाशी, गर्भवतीसम सुस्त सुस्त पण

वांझोटे नभ विसरुन गेले कला आपुली बरसायाची


नकात शोधू, मी सन्यासी आज इथे तर उद्या कुठेही

बघून परकेपण अपुल्यांचे, मनी न इच्छा स्थिरावयाची


कैद पुजार्‍यांनी केलेला, मंदिरात तो असाह्य आहे

कशास धडपड दुबळ्या देवा समोर माथा टेकायाची?


वयस्क झाल्या कलमेमधुनी सळसळ झरते तरुणाई पण

सुरकुतलेला शायर दिसता चर्चा होते फक्त वयाची


का करसी "निशिकांत" अशी तू वादळासवे हातमिळवणी?

येणार्‍या संकटांबरोबर सवय असावी रहावयाची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy