हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
बालपण माझं हरवलं
पण त्यानेच जग दाखवलं
बालपण मी कुरवाळलं
काळीज कप्प्यात ठेवलं........
उगवे रोज नारायण
आठवे आईचे सारवण
कधी देवाचे पारायण
खिन्न होई अंतर्मन............
गरीबाचे बालपण
काय सांगावी आठवण
खाण्या पिण्याची वणवण
पैशाची होती चणचण.........
घरी येता पाहूणे
वाटे मिळतील चाराणे
दुकानावर धावणे
खात खात मिरवणे............
घास घेताच आठवे
बालपणीचा तो क्षण
पोटापाण्यासाठी
बाप फिरे वणवण.........
आठवे शाळेची शिकवण
राष्ट्रगीत जन गण मन
वर्गावर्गात बाराखडी
चढाओढीचे ते पठण..........
रोज शाळेतून आल्यावर
जावे लागे कामावर
अभ्यास रद्दीच्या पुस्तकावर
तरी नाव फलकावर............
बालपण नाही हरवलं
मुलांसमोर गिरवलं
म्हणूनच ताईत मी
मुलांच्या गळ्यातलं
