पार
पार
सगळं पार करता येत नाही आयुष्यात
काही पार आवाक्याबाहेरचे
सगळ्यांना पार करायचंय एकमेकांना
पार करताना पार वाट लागली
तरी चालेल इतक्या निष्कर्षाप्रत
येऊन पोहोचली आहेत माणसें
सगळ्यांनाच पार करायचय
आवाक्याबाहेरचं क्षितिज
सगळ्यांना पार करायचंय यशोशिखर
नैराश्याच्या नंतरचा कडेलोट ही पार करायचा अनेकांना
समाधानाच्या थांब्यावर थांबायला
कुणालाच वेळ नाही
सगळ्यांना जिंकायची आरपारची लढाई
सगळ्या गोष्टी पारदर्शक असल्या तरीही
स्वतःचा पारदर्शकपणा पार
करायला कुणालाच आवडत नाही
उत्सुकतेचं दुसरे नाव पार
एक पार संपला की दुसरा पार
पार एक माईल स्टोन
प्रवास पार पाडण्यासाठी
एक क्षणभर विश्रांती चे स्थान
जायचे होते चंद्रा पार,पण फक्त ठसेंच उमटवलें
सगळी फुशारकी हे पार पडलं, ते पार पडलं म्हणण्यांत गेली
शेवटी काही न काही पार पाडायचं राहतंच
कार्डिओग्रामची न संपणारी रेघच करते जीवन मृत्यूची सीमापार
शरीराच्या पार असतं मन नांवाचें गांव
शब्दांच्या पार असतं भावनांचं आकाश जिथं मन मोकळं होतं
इंद्रियांना पार केलं की मनावर ताबा मिळवता येतो
मनंच मनाला पार करू शकतं शरीर नाही
मनाला पार करता आलं की सगळे प्रश्न आपोआपच सुटतात.
