STORYMIRROR

Kedar Kudekar

Abstract

3  

Kedar Kudekar

Abstract

पाऊस

पाऊस

1 min
13.7K


भोवताल नकळत जेव्हा

घनगर्द होऊनी जातो

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो।


कधी दुडदुडत्या शैशवी

अमृत रुपाने झरतो

कधी बालपणी दिलेल्या

एका पैशास भुलतो

पण आठवणीने सर्व

आठवणींना घेऊनी येतो...

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो।


खेळाच्या बहरी येतो

चिंब भिजवूनी जातो

वाहत्या रस्त्यांमधूनी

नावाही सोडून जातो

हवी-हवीशी सुट्टी शाळेला घेऊनी येतो..

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो।


ज्वानीच्या उंबरठ्यावर

तो आग होऊनी येतो

एकाच छत्रीमधल्या

दो हातांमध्ये शिरतो

धडधडती हृदये, अन् हा

सर्वांग मोहरुनी जातो..

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो।


मग पुन्हा तान्हुला होतो

सर मडके भरुन जाते

आयुष्याच्या बरसातीचे

जलचित्र सुबक रेखते

बेधुंद प्रपातीही बाब

पिलांस सांभाळून घेतो...

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो।


मग संसाराची लगबग

त्याचे काम, तिचे जग

यंत्रांची घरघर, दगदग

आणि अस्फुट तगमग

हे सर्व तटस्थपणाच्या

संततधारेतून बघतो..

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो।


यापुढे खिन्न अवकाश..

उदास अन् आकाश...

एकाकी संध्याकाळी

साथीला फक्त श्वास

अशा वेळी पाऊसही का

लांबून वाकुल्या देतो...

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो।


कधी जाता जाता येतो

सूर अवचित गवसल्याप्रमाणे,

कधी हूल देऊनी जातो

रुसलेल्या अंत:करणाने

जरी इथे थांबला तरीही

कुठे तरी कोसळत रहातो..

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो।


भोवताल नकळत जेव्हा

घनगर्द होऊनी जातो

पाऊस अचानक तेव्हा

संदर्भ होऊनी येतो..

संदर्भ होऊनी येतो..


Rate this content
Log in

More marathi poem from Kedar Kudekar

Similar marathi poem from Abstract