ओढ पावसाची
ओढ पावसाची
लहान होऊनी सरीमध्ये
चिंब भिजूनी जाण्याची
लागली वेड्या मना
ही ओढ पावसाची
मेघ दाटले अंबरी
कर कृपा तू बरसण्याची
अधीर कवेत घेण्या तुला
घाई वसुंधरेची
बरस तू आता तहान भागव धरतीची
लागली वेड्या मना
ही ओढ पावसाची
बळीराजाही नयन लावूनी
पाहतोय आशेने नभाकडे
घाम गाळूनी मोती पिकवण्या
धावतोय शेताकडे
शिवार फुलुनी धान्यांनी ओंजळ भरु दे त्यांची
लागली वेड्या मना
ही ओढ पावसाची
सरीता ही कोरडी पडली
वृक्ष-वेली सुकून गेली
पशूपक्षी वाट पाहती तुझ्या आगमनाची
लागली वेड्या मना
ही ओढ पावसाची
लहान होऊनी सरीमध्ये
चिंब भिजुनी जाण्याची
लागली वेड्या मना
ही ओढ पावसाची