ओढ पावसाची
ओढ पावसाची
घन शिंपडती दवबिंदू
तरारली ही तृणपाती
कोवळ्या धुक्यातुनी
नहाली प्रीतीची नाती
ओढ पावसाची लागे
चातक पक्षी तहानला
थेंब दवाचा पिऊनिया
उंच आभाळी भरारला
अमृतकणांचे सिंचन
झालेय या धरणीवरी
दिवस सुखाचे दावुन
आले चैतन्य चराचरी
उडाला चातक नभात
तहान थेंबांची भागली
निसर्गसृष्टी नव्याने ही
जलधारांमधुनी रंगली
गाणी खुशीची गाऊनी
पाखरे भरारली गगनी
उबारा मिळता जलाने
येतील फिरुनी अंगणी
मोत्यावाणी जलधारा
सांडल्यातच अंगणात
चला वेचूया पागोळ्या
तारका या नभांगणात
शीळ घालूनी कानात
गेला हळूच रानवारा
मेघांनी सांडल्या इथे
धवलश्वेतही हिमगारा
धुक्याचे लेऊनी अभ्र
उगवला भास्कर नभी
प्रसन्न सोवळीच उषा
स्वागताला राही उभी

