नको वागू येड्यावानी
नको वागू येड्यावानी
अरे वांझोट्या ढगा
ये घेऊन पाऊस
बरस रे कवातरी
नको असाच जाऊस
तुझा पिंजका कापूस
कशी आटली र माया
भेगाळली सारी भुई
चटके बसतील पाया
पाणी नाही आभाळात
पाणी भरलं डोळ्यात
तडफडतोय जीव
जशी मासोळी जाळ्यात
कसं जगवू घरदार
कशी वाचतील ढोरं
लागला जीवाला घोर
नशिबी फासाचा दोर
बरंसलं कवातरी
करू पुन्यांदा पेरणी
नको घेऊ फास बाबा
नको वागू येड्यावानी
आपुल्या बी शेतामंदी
येईल बहरं पिकाला
वाट आपल्या घराची
कधी दिसलं सुखाला
बाबा जरा ध्यानी ठेव
बायकापोरं लेकराला
आता मात्र उघड्यावर
नको टाकुस आम्हाला