निळ्या सावळ्या
निळ्या सावळ्या
अशा रिक्त राती कुणा आठवावे ?
बहू आर्त साचे, कुणा पाठवावे ?
कळेना, कसा भार साहून जावे
कितीदा जिवाला असे त्रासवावे !
घनासारखा नीलवर्णी असे जो
मिटो नेत्र घेता समोरी दिसे जो
रचे गोकुळी रास, वेणू जयाचा
दिशा दाखवी सारथी हा जगाचा.
सदा अंतरी भाविकांच्या वसे जो
कुणा राउळी, पंथि कोणा दिसे जो
असे भावना-भक्तिचा जो भुकेला
बनोनी सखा,ज्ञान देतो जगाला
निळ्या-सावळ्या, मी तुझे गीत गाते.
जगा विस्मरोनी तुला आठवीते.
नको अंत पाहू तृषा शांत व्हावी
निळे, मोरपंखापरी रूप दावी.
पुन्हा वेदनांचा कडेलोट झाला.
मनी आर्त धावा, स्वये तोचि आला.
जिथे भाळिच्या रेखिता थांबलेल्या,
तिथे अंगुलीने जरा स्पर्श केला.
निळे टिंब भाळावरी आज शोभे
प्रपंची जिवा, मुक्तिची आस लागे
निळा थेंब त्याचा खुले आज गाली
जिण्याची खरी पूर्तता सार्थ झाली.
