पापणीच्या काठावर
पापणीच्या काठावर
1 min
11.7K
पापणीच्या काठावर
नीज केव्हाची अडून
आत यावया लाजते
कुणी बसले लपून. ||१||
कुणी बसले लपून.
काळजाच्या कोपऱ्यात
कधी, कसे, नि का आले ?
थांगपत्ता ना लागत. ||२||
थांगपत्ता ना लागत
आता आताशा मनाचा
कधी कावरेबावरे
कधी झुला झुलायचा. ||३||
कधी झुला झुलायचा,
उंच उंच जाई वर,
अलगद खाली येतो,
जणू बासरीचा सूर. ||४||
जणू बासरीचा सूर
येई दुरून दुरून
तशी साजण चाहूल
मन जाई मोहरून. ||५||
मन जाई मोहरून
ध्यान लागे वाटेवर
नीज केव्हाची अडून
पापणीच्या काठावर. ||६||
