वसंतातील एक दिवस
वसंतातील एक दिवस
जरा रात होते, नभी चंद्र येतो, झरे चांदणे शांत भूमीवरी,
किती अप्सरांचेच आभास होती ढगांना रुप्याच्या किती झालरी !
निळा रंग झाला उन्हाळी नभाचा अशी सोनकांती वसंती हवा,
पहाटे पहाटे उबेच्या उन्हाने उन्हाळ्यातही लाभला गारवा.
रवी मार्ग कापे बसोनी रथाला गती देतसे सारथी त्याजला,
दुपारी उन्हाचा तडाखा बसोनी, झळा उष्ण येता घरी आसरा.
वसंतातल्या लाल रंगात न्हावी, कडेला दिसावी तशी सावरी,
पिऊनी उन्हाचेच प्याले, दिसावा जसा की बहावा
सुवर्णापरी.
इथे पेटलेले जणू रान सारे दिसावी पलाशात अग्नी शिखा,
पहाता पहाता कशी सांज झाली, नि कोड्यात पाडे ऋतू, सारखा.
सांजेस येती घरी पाखरेही, वसंती झुळूका सुखावी जिवा
रसा आम्र चाखून गोडीत येता, सुगंधासवे येतसे मोगरा.
पुन्हा रात झाली, पुन्हा चांद आला, पुन्हा जागला तारकांचा थवा,
दिसांचे फिरे चक्र आसासभोती नभांकावरी रोज भानू नवा.
