मराठी माता
मराठी माता
संघर्ष पाहुनी लोक टेकती माथा
मातीत मराठी वीर उपजली माता
म्हाळसा लखूचा मान जिजाऊ लेक
ओलांडुन झाली माप भोसले एक
चैतन्य पुंज तो सिंदखेडचा होता
मातीत मराठी वीर उपजली माता
मुघलांच्या आणिक निजामशाही फौजा
रयतेला देई त्रास कराया मौजा
युद्धास त्रासली होती सारी जनता
मातीत मराठी वीर उपजली माता
गड शिवनेरीवर जन्म दिला बाळाला
पदरात कोंडले धगधगत्या जाळाला
संस्कार पाजले तयार करण्या गाथा
मातीत मराठी वीर उपजली माता
बांधणी मराठी जनहृदयाची केली
परकीय राजवट रसातळाला नेली
निर्मिले हिंदवी स्वराज्य बघता बघता
मातीत मराठी वीर उपजली माता
शिवबास शिकवले शौर्य एकता न्याय
जातीस मिटवण्या उभी राहिली माय
जाळले प्रथेला निरोप घेता घेता
मातीत मराठी वीर उपजली माता
