मोहाचे महाभारत
मोहाचे महाभारत
धर्म आणि अधर्माचा
उभा संघर्ष राहिला
दृष्टिहीन धृतराष्ट्र
प्रश्न विचारता झाला
सांग संजया मला तू
पाहतोस जे जे नेत्री
माझे नि पांडुची मुले
काय करी कुरुक्षेत्री
मन माझे आसुसले
युद्ध वर्णन ऐकाया
जिंकतील कोण येथे
कोण बनणार राया
सत्य असत्य काय ते
राजा होता ओळखून
परी पुत्र प्रेमा पोटी
बोले हातचे राखून
कान देऊन ऐकावे
नच सांडावी सर्वथा
सांगे राजाला संजय
महाभारताची कथा
शक्ती कौरवांनी त्यांची
वापरली स्वार्था साठी
सत्य बाजू पांडवांची
देव उभा त्यांच्या पाठी
जेथे साक्षात श्रीकृष्ण
आणि धनुर्धर पार्थ
तेथे विजय निश्चित
त्यांचे जीवन कृतार्थ
