विठूराया तू सावली
विठूराया तू सावली
फार दिसांची असोशी
मायलेकरे भेटती
चंद्रभागा ओसंडते
सारीकडे खुशी खुशी||१||
दिठी भरून आलेली
फक्त पावले सामोरी
पदस्पर्श क्षण येता
भान हरपे राऊळी||२||
पण काय हे नवल
विठुरायाचे चरण
भेगा फोडांनी भरून
रक्त येत असे त्यातून||३||
मंद स्मित त्याचे ओठी
झाली भेट दिठी दिठी
सारे उमगले मला
सल माझे त्याच्या काठी||४||
अर्ध्या निमिषाचा खेळ
पुऱ्या ब्रह्मांडाचा मेळ
विठुराया तू सावली
खरीखरीच माऊली||५||
