मनातला पाऊस
मनातला पाऊस
इतरांच माहीत नाही
पण पाऊस मला नेहमीच आवडतो
तडाडलेल्या जमिनीला तो बेमालूम सांधतो
काही कळतंच नाही
तो नक्की ठिगळ कुठे लावतो
नवकशिद्याची नवझळाळी देऊन
तो कोणते असे अत्तर शिंपडतो
गंध भरुन राहतो श्वासात
तनामनात, रोमरोमात
अन् चैतन्य हरवलेलं माझं मन
प्रफुल्लित होते काही क्षणात
मग सहज विचार येतो मनात
धरणीला सांधतो तसाच एखादा पाऊस
माणसाचं मन सांधायला आला तर
तर माणसाच्याही हृदयात फुलेल
एक अनोखं एकात्मतेचं नंदनवन सुंदर
अठरापगड जातीच्या
तडाडलेल्या हृदयास ठिगळ लावणारा,
तुटलेली मनं सांधणारा
असेल का हो एखादा पाऊस..?
मी चातक बनून वाट पाहतोय त्याची
कधीतरी येईल तो नवआशेचे पंख लावून
प्रत्येकास हवाहवासा वाटणारा
माझ्या मनातला सुप्त पाऊस..!
