महापूर
महापूर
पाऊस एवढा झाला की,
सगळं पाण्यातच गेलं,
जगतोय यासाठी की
सरकारने कर्ज माफ केलं...
पाऊस पडत नसताना
डोळ्यात पाणी यायचं,
काहीच नाही राहिलं
आता वाहून जायचं...
बरं झालं देवानं
मरण दिलं नाही,
जळलं नसतं सरण
पाऊस झाला लई...
पाहून पाणीच पाणी
आला डोळ्याला ही पूर
उरलाय फक्त जीव
गेला वाहून संसार...
नको कुणाची मदत
नको सहानुभूती,
फक्त जळावे सरण
दूर जावा वरती...
वाईट आहे जन्म
शेतकरी, गरिबांचा
करतो आत्महत्या रोज
वीट येऊन जन्माचा...
तो जगाचा पोशिंदा
होतो जिवावर उदार,
जन्म राबण्यात जाई
न मिळे पोटभर...
शेतकऱ्यांच्या लेकरांनी
कसा धरायचा धीर,
काय पहायची स्वप्ने
आला डोळ्याला महापूर...

