मेघराजा.
मेघराजा.
रिमझिम त्या संततधारेने, मेघराजा मजला चिंब भिजू दे
भेगाळल्या वसुंधरेला सांधुनी हिरव्या शालूचा
दरवळूदे मीलनातील तुझ्या गंध हा प्रितीचा
धुंद होऊनी ती फुलपाखरे विहरती आनंदें
मेघराजा मजला चिंब भिजू दे!
अंकुर बीजाचे फुलुनी पिके वा-यासंगे डोलती
पाहुनी जीवन हे स्वछंदी भुमिपुत्रही नाचती
वृक्षवेली नटुनीया सजली सजीवास प्राण दे
मेघराजा मजला चिंब भिजू दे!
हृदयातील भावना कृतज्ञतेने भरुनी ओठीं
प्राणरक्षक वरुणा गीत हे माझे तुझ्याचसाठी
उसवलेल्या काळजाचा असह्य दाह मिटू दे
मेघराजा मजला चिंब भिजू दे!
