माहेर
माहेर
गहिवरल्या भावना माझ्या
आठवणी मनीं स्मरतांना
पावले माझी घुटमळती
माहेरचा उंबरा ओलांडताना.
आईच्या कुशीत बिलगुनी
भाऊला प्रेमाने भांडतांना
रुसवे-फुगवे, पुन्हा बोलणे
विसरु कशी त्या गोड क्षणांना.
बाबांजवळ बालहट्ट करिता
आणू पोरी म्हणून शब्द देई
न विसरता आणता बाबांनी
मन आनंदाने भरुन येई
लहानाची कधी मोठी झाले
थाटामाटात हात पिवळे केले
प्रिय अशा माहेरास माझ्या
निरोप देता डोळे पाणावले
