माझी सोनुकली
माझी सोनुकली
वाट पाही अधीरशा
औत्सुक्याने अपत्याची
परि भोग प्राक्तनाचा
नशिबासी नकारची
वाट पहाणे सोडूनी
गेली अनाथाश्रमासी
छोट्या बाळांना बघूनी
माया दाटे पदरासी
घेता कडेवरी माय
घट्ट वेल बिलगली
घेता अधीर चुंबन
वदे माझी सोनुकली
गोड पाऊले परीची
घरभर बागडली
सुख आले माझ्या दारी
नेत्री आसवे दाटली
सोनुकली सर्वस्वचि
सांगी सर्वां आनंदाने
स्वर्गसुख लाभले गं
सोनुकली आगमने
