माझी माय
माझी माय
माय जातीया पाण्याला हो हो
माय जातीया पाण्याला
काट्याकुट्या तुडवीत
दगडाच्या हृदयाचा
झरा जिवंत शोधित
राखे इमान मातीशी हो हो
राखे इमान मातीशी
हाताले मातीचा वास
तोच भाकरीत उतरे
देई ममतेचा घास
ठिगळाचा हा संसार हो हो
ठिगळाचा हा संसार
केला तिने आजवर
करूनी दु:खावर मात
जशी सुखाची झालर
तिच्या भाळी कायमचं हो हो
तिच्या भाळी कायमचं
आहे कष्टाचे जीवन
तरी बघती सपान
उगवेलं हिरवं रानं
माझी माय अशी थोर हो हो
माझी माय अशी थोर
कसे मानू उपकार
कसं सांगू माय तुले
तू जगण्याचा आधार
