माझी_कविता
माझी_कविता
कोठेतरी वाचलेले,
कोठेतरी ऐकलेले,
जुळून येतात शब्द शब्द.
मग तयार होते मनात माझ्या,
सजलेली नटलेली नववधू जशी ती
माझी कविता…
तिला मी बोलवत नाही,
तिला मी सजवत नाही.
तीच येते मनात माझ्या,
अन् सजते ती माझ्यासाठी…
येते ती माझ्यासाठी,
गाते ती माझ्यासाठी,
कधी अशी कधी तशी,
नांदते ती हृदयात कायम माझ्या,
माझी कविता…
साज शृंगार लेऊन,
येते माझ्या हृदयातून,
लेखणीच्या दारा आडून,
पाहते जरा डोकावून…
थोडीशी लाजते, गालात हसते,
तळपते कधी, कधी निखरते,
कोणत्या रूपात बाहेर येऊ?
असा विचार पण करते,
माझी कविता…
विचार करते ती कधी,
पदर डोक्यावर घेऊन संस्कृतीच गाणं गाऊ
की तोच पदर कंबरेला खोचून
तळपत्या शब्दांची तलवार हाती घेऊ.
शब्दांचे ती वार करते,
लागणाऱ्याला घायाळ करते…
बुडणाऱ्याला तारते ही,
माझी कविता…
आपसूक बाहेर येते,
वहीच्या अंगणात रंग उधळते.
आसमंतात तिचे अंग अंग बहरते.
दरवळ सुगंधी शब्दांचा दुरवर पसरवते.
सर्वांना मोहित करते,
शत्रूलाही आपले करते.
माझी कविता…
कधी हसवते, कधी रडवते,
शब्दांचे बाण चालवून
कधी कोणाला डिवचते,
कधी चिडवते, कधी खिजवते,
डोळ्याने इशारा करून
कधी कोणाला खुणावते.
लाजते अन् कानाखाली वाजवते ही
माझी कविता…
ती जरी माझी असली,
तरी सर्वांच्या हृदयी नांदते.
कोणी तिला दडवून ठेवतो,
बुरख्याआड लपवून ठेवतो.
तिला बाहेर येऊ द्या,
मनसोक्त खेळू द्या.
तुम्हीही म्हणाल मग,
माझ्यासाठीच ती येते,
माझी कविता…
_#गंगाशिवकापुत्र
