माझे गाव
माझे गाव
घरचं आहे जणू अवघे,असे गाव माझे अनोखे
प्रेमळ,मायाळू जन हे मज वाटे हवेहवे ||
परोपकारी मातीवरी,प्रेम करावे भरभरोनी
असे गाव हे माझे,प्रिय आहे मज प्राणाहुनी,
जन्मलो,वाढलो येथेच आम्ही
असे आम्हा अभिमान यांचा
हजारदा मरुनी जन्म घेऊ,येथेच आम्ही नवे नवे
प्रेमळ,मायाळू जन हे मज वाटे हवेहवे ||1||
करत नाही द्वेष कुणाचा
असे हे जन साधे भोळे,
परंतु का सदा गरीबी
करत असते यांचे वाटोळे,
हजार व्यथा आहे आमच्या, ऐकायला कुणी हवे
प्रेमळ,मायाळू जन हे मज वाटे हवेहवे ||2||
दु:ख विसराया कधी कधी
जडली यांना व्यसनांची व्याधी,
शहरी समस्यांच्या खूप पलीकडले माझे गाव
पैशाला नाही मोल, प्रेमाला आहे भाव,
मानवतेचे असे पुजारी,गाव हे माझे अवघे
प्रेमळ,मायाळू जन हे मज वाटे हवेहवे ||3||
ईश्र्वरावर दृढ विश्वास
असे आमचे वैशिष्ट्य खास,
त्याचीच असे सर्व लेकरे
ईश्वराची आम्ही चाकरे,
असे आम्हा कल्पना सुखासंगे दु:ख हवे
प्रेमळ,मायाळू जन हे मज वाटे हवेहवे ||4||
