कवितेच्या गावा
कवितेच्या गावा
कोऱ्या कागदी कुपीत
थेंब शाईचा सजला,
दाणा मोतियाचा जणू
गोड गालात हसला!!
खुणावितो अक्षरासी
घे भेट ह्रदयाची,
आज न्हाऊ कवितेत
चिंब वर्षा भावनांची!!
घेई वाकुल्या वेलांटी
तिसी साथ देतो काना,
येती जुळूनी अक्षरे
शब्द दरवळे मना!!
गंध मोहक तो असा
भुलवितो भ्रमरासी,
पाकळीतले गुंजन
वेड मधाचे गं त्यासी!!
नाचे ओठांवरी तेव्हा
शब्द सुमनांचा रावा,
कवयित्री बागडते
जेव्हा कवितेच्या गावा!!