जगाचा बाप
जगाचा बाप


माय त्याची काळी माती
परि जगाचा तो बाप,
सानुली ओंजळ त्याची
भरी धान्याचे माप!!
राब राबतो शिवारी
मनी हिरवं सपान,
घाली साद मेघराजा
आता बरस जोमानं!!
हाक ऐकूनी तो मेघ
येई धावूनी साथीला,
थेंब घामाचे पुसूनी
चिंब करे धरणीला!!
आनंदेला बळीराजा
कोंब कोवळा पाहता,
पायी तुडवी चिखल
आनंदाचे गीत गाता!!
साथी ढवळ्या पवळ्या
जणू जीव की प्राण,
राबती सारे संगे
मनी कष्टाचे व्रण!!
वारा पाऊस झेलूनी
शिवार लागे फुलू,
उंच उंच येई पीक
बाप लागे मनी डोलू!!
शेतामधी घाली खोप
रात्रंदिन जपी रोप,
सांभाळी जणू मूल
असा सावळा तो बाप!!
उगवली ती पहाट
पीक दिसे सोन्या परि,
हात जोडूनिया उभा
बाप जगाचा शिवारी!!
वेची कणीस आनंदे
जणू मोतियाचा दाणा,
जगा पुरूदे हा साठा
एकच मनी बाणा!!
तृप्त होई जग सारे
देई समाधानी ढेकर,
बाप सुखावे मनात
जरी मिळेना भाकर!!
किती वर्णावी थोरवी
विश्वची त्याचे सदन,
जग पोशिंद्यासी करी
माझी लेखणी वंदन!!