तिची अबोल कहाणी
तिची अबोल कहाणी


थांब ना गं रातराणी
असा घालू नको विळखा,
यायचंय तुझ्याच मिठीत
सोडवूनी भावनांचा गळका!!
परि सुटता हा सुटेना
अश्रू गेले जरी वाहूनी,
व्यथा कोणासी गं सांगू
गेले शब्द ओठीच मावळूनी!!
मावळतीचा सूर्य जसा
देई निरोप मजला,
उधाणती आठवणी
नेत्री भूतकाळ सजला!!
क्षणी हासतसे ओठ
नेत्री भावनांचा पूर,
सांज उधळते रंग
माझा दाटलासे ऊर!!
बघ किनारा सुंदर
संगे लाट मिरवितो,
का माझिया मनात
दु:ख दर्या उधाणतो!!
वेळ रंगीन ही अशी
जाई शिंपिते अत्तर,
तरी सांग ना गं राणी
नाव मज का कातर!!
धुंद आनंद तराणे
उधळिते सांजवेळ,
तिज सामोरी उभी मुक
अशी मी "कातरवेळ"!!