STORYMIRROR

कविता

कविता

1 min
1.4K



*राजे मनामनातले*


विरे हवेत किंकाळ्या

वेशी लक्तरे अब्रूंची

अंतःकरणाची लाही

भ्रष्ट मती सैतानांची !!१!!


जन असह्य ,लाचार

वाली असेल का कोणी ?

कृपा करी जगदंबा

भेदताच आर्त ध्वनी!!२!!


आदीशक्ती जिजाऊंची

कूस झाली हो पवित्र

जगदंब जगदंब

जन्मे हे शिवचरित्र !!३!!


जिजाऊंच्या नजरेनं

स्वप्न स्वराज्याचं पाही

तळपत्या तलवारी

रक्त अभिषेक वाही!!४!!


सिंह गर्जना ऐकता

निसर्गाचा हा दुजोरा

सह्याद्रीच्या दगडांनी

केला झुकून मुजरा!!५!!


काळोखाची आवस ती

झाली मांगल्याची दास

लक्षवेधी गरूडाला

फक्त जिंकण्याचा ध्यास!!६!!


फौज रांगडी मावळ

धुव्वा उडवी स्वा-यांची

करी उद्ध्वस्त वैरी

युक्ती गनिमीकाव्याची !!७!!


स्वराज्याच्या देव्हा-यात

धन पर-स्त्री पूजले

पदराला छेडणारे

बाहू पोलादी छाटले !!८!!


जरी थकला केसरी

दूध पाजले छाव्याला

बाळशंभू रूप तुझे

नाही ग्रहण तेजाला!!९!!


स्वराज्याचं तोरण हे

अबाधित राहो दारी

हीच मंगल कामना

मरताना तुझ्या ऊरी!!१०!!


यज्ञकुंड जीवनाचं

त्यात स्वप्नांची आहूती

प्रजा सुखी पाहणारा

एकमेव छत्रपती!!११!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational