कृष्णसावळे ऊन
कृष्णसावळे ऊन
कृष्णसावळे ऊन
लहरते ऊन ऊन (हळू हळू)
फुटे पालवी मनाला
जाई सांज बहरून...धृ
बघ ओहोळ पाण्याचा
कसा नागवा नाचतो
प्रेम उतू गेले त्याचे
मनी आकांत माजतो
किण किण कांकणांची
करे धरणी लाजून... १
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात
सये अल्लडसा भाव
अग पदर सांभाळ
वारा घेई बघ धाव
वाजे बासरी कान्हाची
थोडी थांबून थांबून... २
त्या क्षितीजापल्याड
गेला सूर्य गं अस्ताला
माझ्या मिठीत गोंडस
आला चंद्र उदयाला
डोळे भिजविती मन
मग भिजून भिजून... ३